
रायगड, 03 मार्च (हिं.स.)। खोपोली पोलीस ठाणे हद्दीत भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका पादचारीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळी न थांबता फरार झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
मौजे होनाड-अत्करगाव रोडवर, राजेंद्र देशमुख यांच्या घरासमोर, ता. खालापूर येथे हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने आपले वाहन अतिवेगाने, बेदरकारपणे व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवले. यावेळी पादचारी असलेल्या रमेश सुभेदार (वय ३९), रा. ग्राम नसारा, तहसिल सैफुर, थाना नंदगंज, जिल्हा गाजीपूर, उत्तर प्रदेश यांना जोरदार धडक दिली.
या अपघातात रमेश सुभेदार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालकाने मदत न करता वाहनासह पळ काढला.
या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुरनं. ७३/२०२६ अन्वये मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४, १३४ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(A), १२५(B) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अमिल धायगुडे करीत असून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके