खामेनींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मालेगावमध्ये कॅन्डल मार्च
Malegaon candle march to protest Khamenei's assassination
खामेनींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी मालेगावमध्ये कॅन्डल मार्च


मालेगाव, 03 मार्च (हिं.स.)इराणचे सर्वोच्च नेते आणि शिया समुदायाचे जागतिक धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनी यांचे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात निधनाच्या वृत्तानंतर, मालेगाव शहरात शिया समुदायाकडून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. तसेच खोमेनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॅनर लावण्या बरोबर शहरात कॅन्डल मार्च काढून खोमेनी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली

सोमवारी रात्री उशिरा मालेगावच्या रस्त्यांवर एक मोठा 'कॅन्डल मार्च' काढण्यात आला. हुसेनी मशिद ट्रस्टपासून सुरू झालेला हा मोर्चा शिया समुदाय कब्रस्थानापर्यंत शांततेत पार पडला. हातात मेणबत्त्या व खोमेनी यांची छायाचित्रे घेऊन मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि तरुण या मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी अमेरिका आणि इस्राईलच्या आक्रमक धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

हा हल्ला केवळ एका देशावर नसून मानवी मूल्यांवर आहे, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. अमेरिका व इस्राइल हे जगावर हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचा फटका केवळ इराणलाच नव्हे तर जगातील अनेक देशांना बसत असल्याची टीका कॅन्डल मार्चमध्ये सामील झालेल्या लोकांनी केली. टेरिफच्या माध्यमातून भारताला देखील अमेरिकन धोरणांचा फटका बसत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande