बीएमआय अहवाल : पश्चिम आशियातील तणावामुळे भारताच्या विकासदरावर परिणामाची शक्यता
नवी दिल्ली , 03 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये वाढत चाललेल्या लष्करी तणावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्याचा फटका भारतालाही बसू शकतो, असा इशारा बीएमआय या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने आपल्या ताज्या अहव
Middle East War India Growth


नवी दिल्ली , 03 मार्च (हिं.स.)। पश्चिम आशियामध्ये वाढत चाललेल्या लष्करी तणावाचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्याचा फटका भारतालाही बसू शकतो, असा इशारा बीएमआय या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने आपल्या ताज्या अहवालात दिला आहे. फिच ग्रुपची ही उपकंपनी असलेल्या बीएमआयने म्हटले आहे की, पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र झाल्यास भारताच्या आर्थिक वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच गुंतवणूकदारांचा आत्मविश्वासही कमी होण्याची भीती आहे.

अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढदर सात टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला असला तरी परिस्थिती वेगाने बदलत आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर निर्माण झालेला संघर्ष आणि त्यानंतर इराणकडून झालेल्या प्रत्युत्तरात्मक कारवायांमुळे पश्चिम आशियातील अस्थिरता वाढली आहे. या घडामोडींमुळे धोरणात्मक अनिश्चितता वाढण्याची शक्यता असून जागतिक गुंतवणूक मंदावू शकते. त्याचा परिणाम भारतातील गुंतवणुकीवर तसेच युरोपीय संघ आणि अमेरिकेसोबत होऊ घातलेल्या व्यापार करारांवरही होऊ शकतो.

विशेषत: स्ट्रेट ऑफ हॉर्मुज या सामुद्रधुनीमार्गे मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची वाहतूक केली जाते. या मार्गावरील पुरवठा खंडित झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते. भारत आपल्या गरजेपैकी सुमारे अठ्ठ्याऐंशी टक्के कच्चे तेल आयात करतो. त्यामुळे तेलदरवाढ झाल्यास महागाई वाढून आर्थिक वाढदरात अर्धा टक्का घट होण्याची शक्यता बीएमआयने व्यक्त केली आहे.

तथापि, भारताने अलीकडेच काही देशांबरोबर केलेले मुक्त व्यापार करार आणि अमेरिकेसोबत सुरू असलेली सुधारित व्यापार चर्चा यशस्वी ठरल्यास आर्थिक वाढीस चालना मिळू शकते. मात्र या सकारात्मक परिणामाची तीव्रता पश्चिम आशियातील तणाव किती काळ टिकतो आणि तेलपुरवठ्यावर त्याचा किती परिणाम होतो, यावर अवलंबून राहणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande