
बेरूत, 03 मार्च (हिं.स.)।इस्रायली सैन्याने मंगळवारी बेरूतमध्ये अनेक हल्ले केले. इस्रायली सैन्य दलाच्या धमकीनंतर लेबनॉनमधील परिस्थिती सातत्याने बिघडत असून, त्यामुळे नागरिक लेबनॉनची राजधानी बेरूत सोडून पलायन करत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.
लेबनॉनवरील इस्रायलच्या हल्ल्यांमागे हिजबुल्लाह हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. लेबनॉनमध्ये सक्रिय असलेली हिजबुल्लाह ही सशस्त्र संघटना इस्रायलविरुद्धच्या युद्धात इराणला पाठिंबा देत आहे. इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ले सुरू केले होते. इस्रायली हल्ल्यांमुळे लेबनॉनमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्रायलच्या धमकीनंतर बेरूतमधील नागरिक लहान मुलांसह राजधानी सोडताना दिसत आहेत. समोर येणाऱ्या दृश्यांमध्ये रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असून, अनेक तास वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांच्या चिंतेची तीव्रता स्पष्ट होत आहे.
बेरूतबाहेरील समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावर किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अनेक कुटुंबे आपल्या गाड्यांमध्ये अडकून पडली होती, सतत हॉर्न वाजत होते, तर काही नागरिक समुद्रकिनारी फेरफटका मारत होते किंवा नवीन आश्रयस्थाने (शेल्टर्स) सुरू होण्याच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते.
इस्रायली सैन्याने आपल्या सोशल मीडिया हँडलवर लेबनॉनची राजधानी बेरूत आणि इराणची राजधानी तेहरान येथे एकाच वेळी हल्ले केल्याचे म्हटले आहे. सैन्याच्या म्हणण्यानुसार, त्यांचे लक्ष्य हिजबुल्लाह आणि इराणी दहशतवादी शासनाशी संबंधित ठिकाणे आहेत. इस्रायली सैन्याने सांगितले की, बेरूतमधील हिजबुल्लाहचे कमांड सेंटर आणि शस्त्रसाठ्याच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात येत आहे. वृत्तानुसार, हल्ल्यांपूर्वी इस्रायली सैन्याने बेरूतच्या दक्षिणेकडील दोन भागांतील सुमारे ५० ठिकाणे रिकामी करण्याचे आदेश दिले होते.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode