
माद्रिद, 03 मार्च (हिं.स.)लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६ साठी नामांकन जाहीर झाले आहे. २०२५ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाचाही या नामांकनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाला लॉरियस टीम ऑफ द इयर श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. या श्रेणीतील हरमनप्रीत कौर आणि कंपनी हे एकमेव नामांकन नाही. तर विविध खेळांमधील पाच इतर जागतिक आघाडीच्या संघांनाही नामांकन मिळाले आहे. याचा अर्थ लॉरियस टीम ऑफ द इयरसाठी एकूण सहा संघांना नामांकन मिळाले आहे.
लॉरियस टीम ऑफ द इयर पुरस्कारासाठी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाविरुद्ध स्पर्धा करणाऱ्या पाच संघांमध्ये इंग्लंड महिला फुटबॉल संघ, युरोपियन रायडर कप संघ (गोल्फ), मॅकलरेन फॉर्म्युला १ संघ (यूके), बास्केटबॉलचा ओक्लाहोमा सिटी थंडर (यूएसए) आणि फुटबॉल क्लब पॅरिस सेंट-जर्मेन (फ्रान्स) यांचा समावेश आहे. २०२५ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भारतीय महिला क्रिकेट संघाला नामांकन मिळाले आहे.
माद्रिद येथे झालेल्या एका समारंभात आठ श्रेणींमध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली. टीम ऑफ द इयर व्यतिरिक्त, आठ श्रेणींमध्ये वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर, वर्ल्ड स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर, वर्ल्ड ब्रेकथ्रू ऑफ द इयर, वर्ल्ड कमबॅक ऑफ द इयर, वर्ल्ड डिसएबिलिटी स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर, वर्ल्ड अॅक्शन स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इयर आणि स्पोर्ट फॉर गुड अवॉर्ड यांचा समावेश आहे.
लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर अवॉर्डसाठी नामांकनांमध्ये टेनिस स्टार कार्लोस अल्कारज आणि मोंडो डुप्लांटिस यांचा समावेश आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर अवॉर्डसाठी, आर्यना सबालेंका, इवाना बोनमॅटी आणि जगप्रसिद्ध जलतरणपटू केटी लेडेकी यांना २०२५ मध्ये त्यांच्या कामगिरीसाठी नामांकन देण्यात आले आहे. लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०२६ च्या विजेत्यांची घोषणा २० एप्रिल रोजी माद्रिदमधील सिबेल्स पॅलेस येथे करण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे