गडकरी रंगायतनमध्ये ओडिसी नृत्याविष्कार; गुरु केलुचरण मोहापात्रांना अभिवादन
ठाणे, 03 मार्च (हिं.स.)। शास्त्रीय ओडिसी परंपरेचे जतन, प्रसार आणि विकास करण्यासाठी कार्यरत असलेल्या अरात्रिका इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेच्या वतीने शनिवारी ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या
Thane


ठाणे, 03 मार्च (हिं.स.)। शास्त्रीय ओडिसी परंपरेचे जतन, प्रसार आणि विकास करण्यासाठी कार्यरत असलेल्या अरात्रिका इन्स्टिट्यूट ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेच्या वतीने शनिवारी ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगावर आधारित विशेष नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे. ओजस्वी शहापूरकर आपली कला यावेळी सादर करणार आहेत. या कार्यक्रमातून प्रेक्षकांना ओडिसी नृत्यशैलीचे सशक्त आणि भावपूर्ण दर्शन अनुभवायला मिळणार आहे.

ओडिसी नृत्यकलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नृत्य निवेदिता मुखर्जी यांनी २००७ साली ठाण्यात या संस्थेची स्थापना केली. शास्त्रीय ओडिसी नृत्यप्रकाराचा प्रचार आणि संवर्धन करण्याच्या स्पष्ट दृष्टिकोनातून उभारलेली ही संस्था गुरु-शिष्य परंपरेत खोलवर रुजलेली असून समृद्ध कलात्मक वारसा पुढे नेण्यास कटिबद्ध आहे.

निवेदिता मुखर्जी यांना प्रख्यात नृत्यांगना झेलम परांजपे तसेच पद्मविभूषण पुरस्कार विजेते दिवंगत गुरु केळुचरण महापात्र यांच्याकडून प्रशिक्षण घेण्याची दुर्मिळ संधी लाभली. गुरुजींच्या कलात्मकतेने प्रेरित होऊन आणि त्यांच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत त्यांनी दोन दशकांपूर्वी ठाण्यात ओडिसीला समर्पित संगोपनस्थळ म्हणून अरात्रिका स्थापन केली.

गेल्या काही वर्षांत अरात्रिका हे केवळ ठाण्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओडिसी अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. ४ ते ६५ पेक्षा अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना विशारद, मंच प्रवेश, गंधर्व परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरील सादरीकरणांसाठी मार्गदर्शन केले जाते. गंधर्व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तंत्र, सिद्धांत आणि सादरीकरणाची काटेकोर तयारी करून घेतली जाते.

यावर्षी विशेष म्हणजे, शताब्दी वर्षाचा (१०० वर्षांचा) उत्सव साजरा करत ओडिसी नृत्यकलेला आकार देत आणि जागतिक स्तरावर पोहोचविणाऱ्या त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करण्यात येणार आहे. पद्मविभूषण सन्मानाने गौरविण्यात आलेले दिवंगत गुरुजी केलुचरण मोहापात्र यांना या कार्यक्रमाद्वारे विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande