
जेरुसलेम, 03 मार्च (हिं.स.) : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील अमेरिकन नागरिकांना तातडीने बाहेर काढणे शक्य नसल्याचे अमेरिकन दूतावासाने स्पष्ट केले आहे. इस्रायलमधील अमेरिकन दुतावासाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सध्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या स्थलांतरासाठी थेट मदत करणे शक्य नसल्याचे सांगितले.
कर्मचाऱ्यांना घरातच राहण्याचे निर्देश
बिघडत्या सुरक्षास्थितीचा विचार करून दूतावासाने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पुढील आदेश मिळेपर्यंत घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. निवासस्थानाच्या परिसरातच सुरक्षित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
देश सोडण्यासाठी पर्याय सुचवले
दरम्यान, देश सोडू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी काही पर्याय सुचवण्यात आले आहेत. इस्रायलच्या पर्यटन मंत्रालयाने २ मार्चपासून ताबा सीमारेषेकडे जाण्यासाठी बस सेवा सुरू केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना मंत्रालयाच्या अधिकृत फॉर्मद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
मात्र, या शटल सेवेबाबत अमेरिकन दूतावासाने कोणतीही शिफारस किंवा हमी देण्यास नकार दिला आहे. हा पर्याय स्वीकारल्यास सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित नागरिकांचीच असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जॉर्डनमार्गे बाहेर पडण्याचा पर्याय
जॉर्डनला जाण्याची इच्छा असलेल्या नागरिकांनी बसने इलात येथे जाऊन तेथून टॅक्सीने Yitzhak Rabin Border Crossing पर्यंत पोहोचता येईल.
बस पकडण्यासाठी खालील ठिकाणांहून सेवा उपलब्ध :
हर्जलिया रेल्वे स्टेशन
हायफातील याद हाशमोना स्टेशन
जेरुसलेममधील Teddy Stadium
तेल अवीवमधील सॅव्हिडोर सेंटर
सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी प्रवासाचा निर्णय घेताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन दूतावासाकडून करण्यात आले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode