
“ऑपरेशन सिंदूर”दरम्यान चीनकडून पाकिस्तानला झालेल्या मदतीवर टीका
नवी दिल्ली, 12 मे (हिं.स.) : “जे देश स्वतःला जबाबदार म्हणवतात त्यांनी विचार करायला हवा की, दशतवादाच्या संरचनांना पाठिंबा दिल्याने त्यांच्या जागतिक प्रतिमेवर काय प्रभाव पडेल ?” अशा शब्दात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी थेट उल्लेख न करता चीनवर टीकास्त्र सोडले आहे
“ऑपरेशन सिंदूर” दरम्यान चीनने पाकिस्तानला तांत्रिक मदत दिल्याचे अहवालात उघड झाले आहे. यासंदर्भात मंगळवारी परराष्ट्र प्रवक्ता रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्हाला याबाबत माहिती होती. अहवालाच्या माध्यमातून त्या माहितीवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. जे देश स्वतःला जबाबदार म्हणवतात, त्यांनी हे विचार करायला हवे की दहशतवादाच्या संरचनांना पाठिंबा देणे त्यांच्या जागतिक प्रतिमेवर काय परिणाम करू शकते असा टोला जयस्वाल यांनी लगावला. तसेच भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले की त्यांची कारवाई केवळ दहशतवादाच्या संरचना नष्ट करण्याच्या उद्देशाने होती आणि ती “अचूक व मर्यादित कारवाई” होती.
भारत ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार
भारत 14 आणि 15 मे 2026 रोजी ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थान परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर सांभाळतील.या परिषदेत ब्रिक्स सदस्य व भागीदार देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी होतील आणि जागतिक तसेच प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील. बैठकीदरम्यान सर्व शिष्टमंडळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.दुसऱ्या दिवशी “BRICS at 20: Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” या विषयावर विशेष सत्र आयोजित केले जाईल, ज्यात जागतिक प्रशासन सुधारणा यावरही चर्चा होईल.
बांगलादेश आणि नेपाळसह संबंधांवरील निवेदन
परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशातील सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केले की भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध सकारात्मक दिशेने पुढे जात आहेत. अलीकडील उच्चस्तरीय देवाणघेवाण आणि राजनैतिक घडामोडींचा देखील उल्लेख करण्यात आला.
नेपाळसह संबंधांबाबत बोलताना मंत्रालयाने सांगितले की दोन्ही देशांमध्ये खोल ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध आहेत. परराष्ट्र मंत्र्यांना नेपाळ सरकारकडून अधिकृत निमंत्रण मिळाले असून, दौऱ्याची तारीख दोन्ही बाजूंच्या सहमतीने निश्चित केली जाईल.
दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की तणावपूर्ण परिस्थितीत 11 भारतीय जहाजे होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर पडली आहेत. मात्र, 13 जहाजे अद्याप पर्शियन आखात परिसरात असून सुरक्षित पुढील प्रवासाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी