
अमरावती, 13 मे (हिं.स.)
१८ लाखांचा मुद्देमाल जप्त, नागपूर,अमरावती येथे केल्यात घरफोड्या
घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीतील दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशातून अटक करून त्यांच्या ताब्यातून १८ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच टोळीतील चार पसार आरोपींच्या शोधात पोलीस आहेत. अशोकसिंह प्रतापसिंह शिकलीकर (वय ३३) आणि धिरज शामलाल केसरवाणी (वय ३५ दोन्ही रा. सिगणोर ता. गोगावा जि. खरगोण, मध्य प्रदेश) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. तर राहुल प्रधानसिंह शिकलीकर, जागरसिंह दयालसिंह शिकलीकर, राजेन्द्रसिंह जितसिंह शिकलीकर आणि संदीपसिंह सोनारसिंह शिकलीकर (सर्व रा. मध्य प्रदेश) अशी पसार आरोपींची नावे आहेत.
शहरात चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येत आहे.जानेवारी ते १२ मेदरम्यान शहरात १९७ घरफोडी व चोरीच्या घटना घडल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीत काही दिवसापूर्वी घरफोडीप्रकरणी झालेल्या पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मध्य प्रदेश येथील सराईत चोरटा अशोकसिंह शिकलीकर याने चोरी केल्याची माहिती समोर आली. पोलिसांचे एक पथक ६ मेपासून त्याच्या शोधात मध्य प्रदेशात होते. परंतु अशोकसिंह मोबाईल वापरत नाही आणि तो एका जागी राहत नसल्यामुळे पोलीस त्याच्या गावालगत जंगल भागात त्याच्या शोधात होते. मंगळवारी सकाळी अशोकसिंह व धिरज गावात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी दोघांना जंगलातून अटक केली आणि अमरावतीला आणले त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अमरावतीसह नागपुर येथे ८ घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच दोघांच्या ताब्यातून ३७.५ ग्रॅम सोन्याची लगड, १४० ग्रॅम चांदिची लगड, रोख १० हजार रुपये आणि चारचाकी असा एकूण १८ लाख ७हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त व दोघांना अटक केली. या कारवाईमध्ये पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे एसीपी शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि महेश इंगोले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी