निष्पाप शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून 70 लाख लुटले, मोबाइल रिचार्ज करणे महागात पडले
अमरावती, 13 मे (हिं.स.)। येथे एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यात आले आहे. केवळ मोबाइल रिचार्ज करण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून, अ
निष्पाप शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून 70 लाख लुटले, मोबाइल रिचार्ज करणे महागात पडले


अमरावती, 13 मे (हिं.स.)।

येथे एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. शेतजमीन विक्रीतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांवर डोळा ठेवून एका ६४ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवण्यात आले आहे. केवळ मोबाइल रिचार्ज करण्याच्या निमित्ताने ओळख वाढवून, अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत एका दांपत्याने या वृद्धाला तब्बल ७० लाख रुपयांनी लुटले. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी दांपत्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

हा शेतकरी मूळचा नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्याचे शहरात स्वतःचे घर आहे. गाडगेनगर भागात आरोपी दांपत्याचे मोबाइलचे दुकान आहे. मोबाइल रिचार्ज करण्यासाठी हा शेतकरी या दुकानात नियमित जात असे. तेथूनच त्यांची या दांपत्याशी ओळख झाली. पुढे महिलेने शेतकऱ्याशी जवळीक वाढवली आणि त्यांच्यात संमतीने संबंध प्रस्थापित झाले.यानंतर मात्र महिलेने आणि तिच्या पतीने संगनमत करून या शेतकऱ्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देणे सुरू केले. बदनामीच्या आणि कारवाईच्या या भीतीमुळे प्रचंड दडपणाखाली असलेल्या या वृद्धाने गेल्या चार वर्षांत टप्प्याटप्प्याने तब्बल ७० लाख रुपये या दांपत्याला दिले. अखेर रात्री उशिरा या शेतकऱ्याने नांदगाव पेठ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. यावरून पोलिसांनी हनी ट्रॅप रचणाऱ्या महिलेसह तिच्या पतीवर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande