
लखनऊ, 13 मे (हिं.स.)।उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मुलायम सिंह यादव यांचे धाकटे पुत्र आणि भाजप नेता अर्पणा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचे बुधवारी निधन झाले. प्रतीक यादव यांच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे. ते अवघे ३८ वर्षांचे होते.
प्राथमिक माहितीनुसार, त्यांना सकाळी सुमारे सहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात आणण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रतीक यादव यांच्या पश्चात पत्नी अर्पणा यादव आणि दोन मुली असा परिवार आहे. या संपूर्ण घडामोडीदरम्यान अर्पणा यादव लखनऊमध्ये नव्हत्या.
प्रतीक यादव यांच्या निधनाबाबत सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेश चंद्र पांडे यांनी सांगितले की, “त्यांना सकाळी ५:५५ वाजता मृत अवस्थेत आणण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.”
प्रतीक यादव यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक राजकीय नेत्यांनी लखनऊ येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अर्पणा यादव यांचे पती प्रतीक यादव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्रतीक यादव यांचा स्वतःचा रिअल इस्टेट आणि जिम व्यवसाय होता. ते लखनऊस्थित ‘फिटनेस प्लॅनेट’ जिमचे मालक होते. तसेच ते ‘जीव आश्रय’ नावाची संस्था चालवत होते. याशिवाय ते रिअल इस्टेट व्यवसायातही कार्यरत होते.
प्रतीक यादव हे देशातील सर्वात मोठ्या राजकीय घराण्यांपैकी एक असलेल्या यादव कुटुंबातील धाकटे पुत्र होते. त्यांनी कायमच राजकारणापासून दूर राहणे पसंत केले. त्यांनी ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स येथून शिक्षण घेतले होते. प्रतीक यादव (३८) आणि अर्पणा यादव (३६) यांचा प्रेमविवाह ४ डिसेंबर २०११ रोजी सैफई येथे अत्यंत भव्य समारंभात झाला होता. विवाहापूर्वी दोघांचे जवळपास दहा वर्षांचे नाते होते. शालेय जीवनात सुरू झालेली मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि यादव कुटुंबातील चर्चित विवाह ठरली. दोघेही लखनौतील विक्रमादित्य मार्गावरील निवासस्थानी राहत होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode