
अमरावती, 13 मे (हिं.स.)
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील तब्बल १८.८१ कोटी रुपयांची प्रलंबित देयके न मिळाल्याने अमरावती जिल्हा जीवन प्राधिकरण कंत्राटदार असोसिएशनने देयकांच्या मागणीसाठी ६ मेपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. सात दिवस उलटून अद्यापपर्यंत अधिकारी किंवा शासनाने आंदोलनाची कुठलीही दखल घेतलेली नाही. परिणामी कंत्राटदार असोसिएशनने आंदोलन तीव्र केले असून १४ मेपासून पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे बंद करण्याचा इशारा दिला आहे.असोसिएशनचे अध्यक्ष नितीन आर. काळे, उपाध्यक्ष संजय ए. सिंह, सचिव अनिल भटकर व मार्गदर्शक धनंजय बंड यांनी दिलेल्या निवेदनानुसार सन २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीतील एकूण १८.८१ कोटी रुपयांची देयके मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रलंबित आहेत.निधीअभावी १ एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठ्याशी संबंधित कामे बंद करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, एप्रिलमध्ये निधी वितरित करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.त्यानंतर १५ एप्रिल रोजी मुंबई येथे संचालक (वित्त) यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ८ ते १० दिवसांत निधी वितरित करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र एप्रिल संपूनही अद्याप देयके न मिळाल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रलंबित देयकांमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचे सांगत कंत्राटदारांनी १४ मेपासून देखभाल व दुरुस्तीची सर्व कामे थांबविण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन जनआक्रोश निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी