हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित हाणामारी; तरुणाला दगडावर आपटून मांडीचे हाड मोडले
रायगड, 23 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील तळा तालुक्यात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खांबिवली आदिवासी वाडीत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही थरारक मारहाण झ
tala


रायगड, 23 मे (हिं.स.)। जिल्ह्यातील तळा तालुक्यात हळदीच्या कार्यक्रमात झालेल्या किरकोळ वादाने अचानक हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे खांबिवली आदिवासी वाडीत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही थरारक मारहाण झाली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खांबिवली आदिवासी वाडीत हळदीचा कार्यक्रम सुरू असताना गावातील काही मुलांमध्ये किरकोळ वाद झाला होता. यावेळी फिर्यादी व साक्षीदार यांनी मध्यस्थी करत “भांडण करू नका” असे सांगून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही बाब आरोपींना चांगलीच खटकली. संतापलेल्या आरोपींनी थेट फिर्यादी व साक्षीदारांवर धाव घेत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली. या मारहाणीत आरोपी क्रमांक १ याने घरावर लावलेला मातीचा कौल उचलून साक्षीदाराच्या डोक्यात फेकून गंभीर दुखापत केल्याचे समोर आले आहे.

एवढ्यावरच आरोपी थांबले नाहीत. दुसरा साक्षीदार जीव वाचवण्यासाठी पळून जात असताना आरोपींनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याला बेदम मारहाण करत उचलून दगडावर आपटल्याने त्याच्या मांडीचे हाड मोडले. या अमानुष मारहाणीनंतर आरोपींनी संबंधितांना “जिवे ठार मारू” अशी धमकीही दिली.

या प्रकरणी तळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२६(२), ११८(१)(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहवा/खिरीट करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande