
अहमदपूर, 23 मे (हिं.स.) : स्थानिक प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली असताना, अहमदपूर शहरातील वॉर्ड क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी नगरसेवक Bhayyabhai Sayyed यांनी स्वतः नाल्यात उतरून सफाई करत जनतेप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित केली आहे. त्यांच्या या स्वच्छता मोहिमेची सध्या शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे.
वॉर्ड क्रमांक ७ मधील मुख्य नाल्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कचरा, प्लास्टिक आणि चिखल साचला होता. त्यामुळे नाल्याचे पाणी तुंबून परिसरात दुर्गंधी पसरली होती. तसेच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता.
स्थानिक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर भय्याभाई सय्यद यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी हातात फावडे घेऊन थेट नाल्यात उतरून सफाई करण्यास सुरुवात केली. एका माजी लोकप्रतिनिधीला प्रत्यक्ष नाल्याची साफसफाई करताना पाहून परिसरातील नागरिकही भारावून गेले.
भय्याभाई यांच्या या कृतीतून प्रेरणा घेत काही स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून संपूर्ण नाला स्वच्छ करण्यात आला.
यावेळी बोलताना भय्याभाई सय्यद म्हणाले, “पद असो वा नसो, जनतेची सेवा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. पावसाळ्याच्या तोंडावर नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, म्हणून मी स्वतः ही सफाई मोहीम हाती घेतली.”
त्यांच्या या कार्याचे वॉर्ड क्रमांक ७ मधील नागरिकांनी कौतुक केले असून, “लोकप्रतिनिधी असावा तर असा,” अशा शब्दांत त्यांच्या कामाचे स्वागत करण्यात येत आहे.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis