
परभणी, 23 मे (हिं.स.)।
सेलू परिसरात गेल्या काही दिवसांपासून सोलर प्लांटवरील वायर तसेच शेतकर्यांच्या विद्युत मोटारी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत आंतरजिल्हा वायर चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे..
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक 22 मे रोजी सेलू आणि पाथरी परिसरात चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते. दरम्यान, पथकाला गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी जालना जिल्ह्यातील परतूर येथील पारधी वाडा परिसरातून अर्जुन रजनी चव्हाण या संशयिताला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीची पोलिसांनी वैद्यकीय विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणार्या अर्जुन चव्हाण याने अखेर आपल्या इतर साथीदारांसह सेलू येथील पाथरी रोडवरील मंजित जिनिंग परिसर आणि वालूर शिवारातील सोलर प्लांटवरील वायर, प्लेट्स तसेच पाण्याच्या विद्युत मोटारी चोरल्याची कबुली दिली.
आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल जालना जिल्ह्यातील आष्टी येथील एका व्यापार्याला विकल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या गुन्ह्यातील सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सेलू पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन मोठ्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला सेलू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशान्वये आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार तसेच विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, मुकेश बुधवंत, सिद्धेश्वर चाटे, मधुकर ढवळे, विष्णू चव्हाण, नामदेव दुबे, राम पोळ, गजानन क्षीरसागर आणि हनवते यांनी सहभाग घेतला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis