
लातूर, 23 मे (हिं.स.) : अंधोरी जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या मौजे मोघा येथे नदी पात्राच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाच्या कामाला वेग आला असून, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी साठवण तलावाच्या सांडव्यातून आलेले पाणी आणि नदीचे पाणी पात्राबाहेर पडल्याने अनेक शेतांमध्ये पाणी घुसले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी युद्धपातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच अविनाश भय्या जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नदी पात्राच्या कामाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात आले आहे.
पूरस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये आणि कामाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी प्रफुल्लचंद्र गुंडरे यांनी संबंधित विभागाच्या अभियंत्यांसह घटनास्थळी भेट देत कामाची पाहणी केली. भविष्यातील पुराचा धोका कायमस्वरूपी टाळण्यासाठी कोणत्या तांत्रिक उपाययोजना आवश्यक आहेत, याबाबत त्यांनी अभियंत्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी मोघा येथील नेताजी कदम यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी दाखवलेली तत्परता आणि सुरू असलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टाळण्यासाठी तातडीने निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, अविनाश भैया जाधव, प्रफुल्लचंद्र गुंडरे तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानण्यात आले. या कामामुळे मोघा आणि परिसरातील शेती भविष्यात अधिक सुरक्षित राहील, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis