
नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.)।अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ आणि भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्यात रविवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये प्रतिनिधीस्तरीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठकीच्या पहिल्या सत्रानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी मार्को रुबिओ आणि डॉ. एस. जयशंकर यांनी पश्चिम आशियातील संघर्ष, अमेरिकेच्या व्हिसा नियमांमधील बदल, भारतीयांविरोधातील वांशिक टिप्पण्या, होर्मुझ सामुद्रधुनी खुली ठेवण्याचा मुद्दा आणि भारत-अमेरिका धोरणात्मक संबंध यांसारख्या विषयांवर सविस्तर भूमिका मांडली.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी जे-१, एफ-१ आणि एच-१बी व्हिसा नियमांमध्ये करण्यात आलेल्या अलीकडील बदलांबाबत भारताच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, भारतीय कंपन्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेत २० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे आणि ही गुंतवणूक आणखी वाढेल, अशी अमेरिकेला अपेक्षा आहे.रुबिओ म्हणाले, “अमेरिकेतील स्थलांतर व्यवस्थेत सुरू असलेले बदल किंवा आधुनिकीकरण हे कोणत्याही एका देशावर, विशेषतः भारतावर लक्ष केंद्रित करून केले जात नाहीत. ही एक जागतिक प्रक्रिया आहे आणि ती संपूर्ण जगभर लागू केली जात आहे. सध्या अमेरिका आपल्या स्थलांतर व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या टप्प्यातून जात आहे.”त्यांनी पुन्हा स्पष्ट केले की, ही प्रक्रिया भारताला लक्ष्य करण्यासाठी नाही. हा संक्रमणाचा काळ असून त्यात काही अडचणी येऊ शकतात. मात्र, अमेरिका अधिक सक्षम, कार्यक्षम आणि टिकाऊ स्थलांतर प्रणालीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
इराणच्या मुद्द्यावर बोलताना मार्को रुबिओ म्हणाले, “मला वाटते की पुढील काही तासांत आणखी सकारात्मक बातम्या येतील. या संदर्भातील पुढील घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करतील. काही महत्त्वाची प्रगती झाली आहे, मात्र ती अंतिम टप्प्यातील नाही. अमेरिकेचे अंतिम उद्दिष्ट असे आहे की इराणने कधीही अण्वस्त्रे तयार करू नयेत.” होर्मुझ सामुद्रधुनीबाबत ते म्हणाले, “होर्मुझ ही एक आंतरराष्ट्रीय जलवाहतूक मार्गिका आहे. इराण सध्या या मार्गाचा वापर करणाऱ्या व्यापारी जहाजांना लक्ष्य करण्याच्या धमक्या देत आहे, जे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कोणत्याही निकषांनुसार बेकायदेशीर आहे. मागील ४८ तासांत आखाती भागातील आमच्या भागीदारांसोबत एका आराखड्यावर प्रगती झाली आहे. ती यशस्वी ठरल्यास होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होऊ शकते.”
भारतासोबतच्या संबंधांबाबत रुबिओ म्हणाले, “भारतासोबत आम्ही ज्या विविध मुद्द्यांवर एकत्र काम करतो, त्यावरून भारत हा अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचे स्पष्ट होते. भारत हा जगातील आमच्या सर्वात महत्त्वाच्या धोरणात्मक भागीदारांपैकी एक आहे.”ते पुढे म्हणाले, “या भागीदारीची सुरुवात आपल्या समान मूल्यांपासून होते. मात्र, धोरणात्मक भागीदारी यापेक्षा खूप व्यापक असते. जेव्हा दोन देशांचे हितसंबंध समान असतात आणि ते समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे काम करतात, तेव्हाच खरी धोरणात्मक भागीदारी निर्माण होते.”
अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकांविरोधात होणाऱ्या वांशिक टिप्पण्यांबाबत विचारले असता रुबिओ म्हणाले, “मी अशा टिप्पण्यांना अत्यंत गंभीरतेने घेतो. ऑनलाइन आणि इतर माध्यमांवर काही लोकांनी अशा प्रकारच्या टिप्पणी केल्याचे मला माहीत आहे. जगातील प्रत्येक देशात काही मूर्ख लोक असतात. इथेही असतील आणि अमेरिकेतही असे लोक आहेत, जे कायमच मूर्खपणाच्या गोष्टी बोलत असतात.”ते पुढे म्हणाले, “जगभरातून अमेरिकेत येणाऱ्या लोकांमुळे आमचा देश अधिक समृद्ध झाला आहे.”
दरम्यान, संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले, “भारत हा मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्यांचे अमेरिका, इस्रायल, इराण आणि आखाती देशांशी अत्यंत चांगले आणि मजबूत संबंध आहेत. त्यामुळे त्या भागात आमची खरी आणि गंभीर रुची आहे.” ते म्हणाले, “या परिस्थितीत आमच्यासमोरील मोठे आव्हान म्हणजे हे सर्व संबंध टिकवून ठेवणे, आमच्या हितांचे संरक्षण करणे आणि त्यांना पुढे नेणे.”
जयशंकर यांनी स्पष्ट केले की, “आम्ही या परिस्थितीकडे बेरीज-वजाबाकीच्या खेळासारखे पाहत नाही. काही मूलभूत तत्त्वांच्या आधारावर आम्ही या भागात पुढे जाऊ. आम्हाला पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य हवे आहे.” ते पुढे म्हणाले, “प्रवासी भारतीयांचे कल्याण आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्हाला ऊर्जा दर कमी व्हावेत असे वाटते, कारण भारत हा मोठा ऊर्जा आयातदार देश आहे आणि त्यातील बहुतांश ऊर्जा या भागातून येते.”“या प्रदेशातून सुरक्षित आणि अखंड सागरी व्यापार सुरू राहावा, तसेच बाजारपेठा खुल्या व्हाव्यात, कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे,” असेही जयशंकर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode