
इंधनटंचाईवर शासन सकारात्मक कारवाई, व्यापाऱ्यांचा संप मागे
लासलगाव, 24 मे (हिं.स.)।
: इंधनटंचाईच्या समस्येवर शासन स्तरावरून सकारात्मक पावले उचलली जात असल्याने, लासलगाव मर्चेंट्स असोसिएशनने आपला संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (२५ मे २०२६) बाजार समितीमधील शेतीमालाचे दैनंदिन लिलाव पूर्ववत सुरू होणार आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेले बाजार आवारातील कामकाज पुन्हा वेगाने सुरू होईल.
इंधनटंचाईमुळे व्यापारी वर्गाला शेतीमालाची वाहतूक करताना मोठ्या अडचणी येत होत्या. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी लासलगाव मर्चेंट्स असोसिएशनने २० मे २०२६ रोजी बाजार समितीला पत्र देऊन लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. व्यापाऱ्यांच्या या भूमिकेनंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने तातडीने शासन स्तरावर पाठपुरावा केला. याची दखल घेत निफाडच्या तहसीलदारांनी व्यापारी असोसिएशनच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. प्रशासनाकडून मिळालेल्या सकारात्मक आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी आपली भूमिका मवाळ केली आहे. बाजार समितीने केलेला पाठपुरावा आणि प्रशासनाच्या आश्वासनाबद्दल लासलगाव मर्चेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीनकुमार जव्हेरीलाल जैन यांनी आभार मानले आहेत. असोसिएशनच्या सर्व सभासद व्यापाऱ्यांनी संप मागे घेतला असून सोमवार, २५ मेपासून सर्व व्यापारी नेहमीप्रमाणे लिलावाच्या कामकाजात सक्रिय होणार आहेत. त्यामुळे लासलगाव बाजारपेठेत पुन्हा एकदा मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV