
अमरावती, 07 मे (हिं.स.)।
अमरावती शहरात पार पडलेल्या एका भव्य आणि अनोख्या विवाह सोहळ्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. श्री रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपूर येथील जगद्गुरु स्वामी श्री राम राजेश्वराचार्य माऊली सरकार यांच्या मानस कन्येचा विवाह अत्यंत थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने संपन्न झाला. धार्मिक वातावरण, राजेशाही थाट आणि सांस्कृतिक वैभव यांचा सुंदर संगम या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाला.या विवाह सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरली नवरीची हत्तीवरून काढण्यात आलेली शाही वरात. विशेष सजविण्यात आलेल्या हत्तीवर नवरी विराजमान झाली होती. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही भव्य वरात काढण्यात आली. वरातीदरम्यान फुलांची उधळण, पारंपरिक वेशभूषा आणि आकर्षक रोषणाईमुळे वातावरण अधिकच देखणे झाले होते. हत्तीवरून निघालेल्या नवरीच्या या अनोख्या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी या सोहळ्याचे छायाचित्रण आणि व्हिडीओ शूटिंग करून हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.विवाह सोहळ्याला अधिक रंगत आणण्यासाठी दक्षिण भारतातून खास साउथ इंडियन बँड पथकाला निमंत्रित करण्यात आले होते. बँडच्या दणदणीत वादनाने आणि पारंपरिक धूनांनी संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये आणि बँडच्या तालावर उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.या शाही विवाह सोहळ्यास देशभरातील विविध भागांतून आलेले साधू-संत, धार्मिक क्षेत्रातील मान्यवर, भाविक तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. विवाहस्थळी आकर्षक सजावट, भव्य मंडप आणि पारंपरिक विधींमुळे सोहळ्याला वेगळेच वैभव प्राप्त झाले होते.अमरावती शहरात अशा प्रकारचा राजेशाही आणि धार्मिक परंपरेचा संगम असलेला विवाह सोहळा क्वचितच पाहायला मिळतो. त्यामुळे या विवाहाची चर्चा सध्या संपूर्ण शहरात रंगत असून नागरिकांमध्येही या अनोख्या सोहळ्याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी