
ढाका, 07 जुलै (हिं.स.)। बांग्लादेशातील सावर परिसरात सोमवारी रात्री नॅशनल सिटिझन पार्टी (एनसीपी)च्या रॅलीनंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेदरम्यान झालेल्या स्फोटात तीन जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एनाम मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
एनसीपीचे संयुक्त मुख्य समन्वयक आरिफुर रहमान तुहिन यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, सावर येथे पक्षाच्या ‘जुलै मार्च’ दरम्यान हा हल्ला झाला असून त्यात किमान तीन जण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर लगेचच एनसीपीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे संयोजक नाहिद इस्लाम यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढत हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
हा स्फोट रात्री सुमारे 9.45 वाजता सावर पोलीस ठाणे स्टँडजवळील ईदगाह मैदानात झाला. येथे पक्षाची रॅली संपल्यानंतर जाहीर सभा सुरू होती. एनसीपीचे केंद्रीय सदस्य यासिर अराफात यांनी सांगितले की, ढाका जिल्हा एनसीपीच्या संयोजिका इंजिनिअर नबीला तसनीद या सभेला संबोधित करत असताना हा स्फोट झाला. त्यांनी पुढे सांगितले की, घटनेच्या वेळी व्यासपीठावर पक्षाचे संयोजक नाहिद इस्लाम, सदस्य सचिव अख्तर हुसेन, उत्तर विभागाचे मुख्य आयोजक सरजिस आलम यांच्यासह अनेक केंद्रीय नेते उपस्थित होते.
एनसीपीने सोमवारी ‘जुलै मार्च’ मोहिमेची सुरुवात केली होती. जुलै आंदोलनाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिनाभर चालणाऱ्या अभियानाचा हा एक भाग आहे. या मार्चची सुरुवात दुपारी गाझीपूरमधील कालिगंज श्रमिक कॉलेज परिसरातून झाली होती. तेथील कार्यक्रमानंतर नाहिद इस्लाम सावर येथे पोहोचले.या कार्यक्रमाला जातीय युवाशक्तीचे अध्यक्ष तारिकुल इस्लाम, संघटन सचिव रिफात राशिद तसेच एनसीपीचे केंद्रीय संयुक्त मुख्य आयोजक अली नासेर खान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode