राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत परभणीच्या दोन नाटकांची दिमाखदार कामगिरी
परभणी, 07 जुलै, (हिं.स.)। सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरीत परभणीच्या दोन नाटकांनी उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या रंगभूमीचा गौरव वाढविला आहे. छत
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत परभणीच्या दोन नाटकांची दिमाखदार कामगिरी


परभणी, 07 जुलै, (हिं.स.)। सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावरील प्राथमिक फेरीत परभणीच्या दोन नाटकांनी उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या रंगभूमीचा गौरव वाढविला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात राजीव गांधी युवा फोरम आणि क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्टच्या कलावंत व तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात आला.

राजीव गांधी युवा फोरम, परभणी निर्मित 'संपूर्ण' या नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावत स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. या नाटकासाठी विजय करभाजन यांना प्रथम दिग्दर्शन पारितोषिक, किशोर पुराणिक आणि डॉ. अर्चना चिक्षे यांना उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक (प्रथम पारितोषिक), तर अनिल पांडे यांना प्रकाश योजनासाठी तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले.

क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्ट, परभणी निर्मित 'ते दिवस' या नाटकानेही विविध तांत्रिक विभागांमध्ये विशेष ठसा उमटविला. किशोर पुराणिक यांना नेपथ्य विभागात तृतीय, रेवती पांडे यांना रंगभूषेसाठी द्वितीय, रेणुका अंबेकर यांना वेशभूषेसाठी द्वितीय, तर त्र्यंबक वडसकर यांना संगीत दिग्दर्शनासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. तसेच अभिनेत्री सई चिटणीस यांना अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्राने गौरविण्यात आले.

'संपूर्ण'ची यशस्वी टीम

'संपूर्ण' या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक विजय करभाजन असून निर्माता संजय पांडे आहेत. नाटकात किशोर पुराणिक आणि डॉ. अर्चना चिक्षे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. नेपथ्याची जबाबदारी स्नेहल पुराणिक व ऐश्वर्या पुराणिक, रंगभूषा व वेशभूषा संतोष चिक्षे व सरोज पांडे, संगीत दिनेश नरवाडे व अनिल पांडे, प्रकाश योजना नारायण त्यारे व आदित्य पांडे, तर रंगमंच व्यवस्था श्रीपाद कासराळीकर, प्रभाकर जोशी आणि मंगल जोशी यांनी सांभाळली.

'ते दिवस'च्या तांत्रिक बाजूचेही कौतुक

'ते दिवस' या नाटकाचे लेखक विजय करभाजन, दिग्दर्शिका सुनिता करभाजन आणि निर्माता प्रसाद बालनाथ देशपांडे आहेत. प्रेम शिंदे, भाग्यश्री गायकवाड, रवि पुराणिक, ज्योती जोशी, सुहास बिडकर, विजय करभाजन, भानुदास जोशी, सई चिटणीस, श्रावणी कुलकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी आणि नागेश कुलकर्णी यांनी विविध भूमिका साकारल्या. नेपथ्य किशोर पुराणिक व बालाजी दामुके, रंगभूषा रेवती पांडे, वेशभूषा रेणुका अंबेकर, संगीत त्र्यंबक वडसकर व श्रद्धा वडसकर, प्रकाश योजना नारायण त्यारे व शौनक पांडे, तर रंगमंच व्यवस्था अरविंद शहाणे, दिनकर जोशी, बाळू साखरेकर आणि राजलक्ष्मी देशपांडे यांनी समर्थपणे सांभाळली.

या उल्लेखनीय यशामुळे परभणीच्या हौशी रंगभूमीला नवी ऊर्जा मिळाली असून, शहरातील रंगकर्मींकडून सर्व विजेत्या कलाकार, तंत्रज्ञ आणि संस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande