नवी दिल्ली, 01 ऑक्टोबर (हिं.स.) : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात (डीए) 3 टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार लागू केली जाणार आहे आणि ती सर्व केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर, निवृत्त कर्मचाऱ्यांवर व कुटुंबीय निवृत्तिवेतनधारकांवर लागू होईल.
दसरा आणि दिवाळी अशा प्रमुख सणांपूर्वी ही वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गहूच्या किमान समर्थन मूल्यामध्ये (एमएसपी) देखील वाढ करण्यात आली असून, त्यात प्रति क्विंटल 160 रुपयांची वाढ करून 2585 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की, 49.2 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 68.7 लाख निवृत्त कर्मचारी यांना या निर्णयाचा लाभ होईल. यामुळे महागाई भत्ता आणि महागाई दिलासा रकमेची टक्केवारी मूळ पगाराच्या 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांपर्यंत वाढेल. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होईल. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचे थकीत पैसे दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिले जातील.या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी अंदाजे 10.083.96 कोटींचा भार पडणार आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाने सुचवलेल्या सूत्रानुसार करण्यात आली आहे.सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 हजार रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा 900 रुपयांची वाढ मिळेल, तर 40 हजार मूळ वेतन असणाऱ्याला 1200 रुपयांची वाढ मिळणार आहे. तीन महिन्यांची थकीत रक्कम अनुक्रमे 2700 ते 3600 रुपयांपर्यंत होईल. सणासुदीच्या काळात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना या निर्णयामुळे आर्थिक दिलासा मिळणार आहे.--------------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode