ठाणेकरांसाठी गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही सगळे कटीबद्ध - ठाणे आयुक्त
ठाणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेचा ४३वा वर्धापन दिन आज, बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आण
ठाणेकरांसाठी गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी आम्ही सगळे कटीबद्ध'  •	ठाणे महापालिका


ठाणे, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिकेचा ४३वा वर्धापन दिन आज, बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख गिरिश झळके उपस्थित होते.

त्यानंतर, अग्निशमन दल, सुरक्षा दल, एमएसएफ यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व सुजीत रामचंद्र पस्ते, केंद्र अधिकारी, वागळे इस्टेट, अग्निशमन केंद्र आणि सागर सूर्यकांत शिंदे, केंद्र अधिकारी, पाचपाखाडी अग्निशमन केंद्र यांनी केले.

ध्वजारोहण व संचलन सोहळ्यानंतर, कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केले. यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी उपस्थित होते.

वर्धापन दिन हा कर्तव्य भावनेची जाणीव करून देणारा दिवस असतो. ज्या जनसामान्यांसाठी या संस्थेची स्थापना झाली, त्यांचे हित व अहित लक्षात घेऊन काम करण्याची ऊर्जा देणारा हा दिवस आहे. ठाणे महापालिकेत काम करणाऱ्या प्रत्येकाची निती, धोरण, कामाची पद्धत लोकहितकारी असली पाहिजे. ठाणेकरांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी कटीबद्ध राहण्याची प्रतिज्ञा आम्ही सगळे आजच्या वर्धापन दिनी करतो आहोत, असे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले.

त्याचप्रमाणे, वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच, कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासह उपायुक्त गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आणि माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande