फिलीपिन्स 6.7 तीव्रतेच्या भूकंपाने हादरले, ३१ जण ठार, अनेक जखमी
मनिला, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। फिलिपीन्समध्ये मंगळवार (दि.३०) रात्री आलेल्या 6.7 तीव्रतेच्या भूकंपाने मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. या भूकंपामुळे एक चर्च कोसळले असून, अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. भूकंपाचे केंद्र सेबू प्रांतातील बोगो शहराच्
फिलीपिन्समध्ये 6.7 तीव्रतेच्या भूकंप


मनिला, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। फिलिपीन्समध्ये मंगळवार (दि.३०) रात्री आलेल्या 6.7 तीव्रतेच्या भूकंपाने मोठ्या प्रमाणावर हानी केली आहे. या भूकंपामुळे एक चर्च कोसळले असून, अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. भूकंपाचे केंद्र सेबू प्रांतातील बोगो शहराच्या ईशान्य दिशेला १७ किलोमीटर अंतरावर होते. या भूकंपात आतापर्यंत ३१ लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. हा भूकंप इतका शक्तिशाली होता की नागरिक घाबरून रस्त्यावर घराबाहेर पळून आले.

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित अधिकारी रेक्स यगोट यांनी सांगितले की, बोगो हे सेबू प्रांतातील एक सागरी किनाऱ्यावरील शहर असून, त्याची लोकसंख्या सुमारे ९०,००० आहे. या शहरात किमान १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि मृतांचा आकडा वाढू शकतो, असे त्यांनी सांगितले. भूस्खलन आणि दगडांनी झाकलेल्या एका डोंगराळ गावात यंत्रसामग्री पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एक अन्य अधिकारी, ग्लेन उर्सल यांनी सांगितले की, “बोगो भागात प्रवेश करणे कठीण झाले आहे कारण तिथे अजूनही धोका आहे.” त्यांनी सांगितले की काही जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. बोगो जवळील मेडेलिन शहरात किमान १२ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती शहराच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या प्रमुख जेम्मा विलामोर यांनी दिली आहे. काही लोकांचा मृत्यू झोपेत असताना घरांची छतं आणि भिंती कोसळल्यामुळे झाला.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, फिलिपीन्स ज्वालामुखी आणि भूकंप विज्ञान संस्थाने सेबू तसेच लगतच्या लेयटे आणि बिलिरन प्रांतांच्या तटीय भागांतील लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे. फिलिपीन्स हा जगातील सर्वाधिक आपत्ती-प्रवण देशांपैकी एक आहे. हा देश प्रशांत महासागराच्या “रिंग ऑफ फायर”, म्हणजेच भूकंपीय तणाव क्षेत्रामध्ये येतो. येथे दरवर्षी वादळे व चक्रीवादळे येतात.

फिलिपीन्समधील सेबू आणि अन्य प्रांत चक्रीवादळ ‘बुआलोई’ च्या तडाख्यातून नुकतेच सावरत होते, की आता भूकंपाने पुन्हा संकट ओढवले. या वादळामुळे कमीत कमी २७ लोकांचा मृत्यू झाला होता. बहुतांश लोक हे पाण्यात बुडाल्यामुळे किंवा झाडं कोसळून मरण पावले होते. वादळामुळे अनेक शहरांचा वीजपुरवठा खंडित झाला होता आणि हजारो लोकांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी हलवावे लागले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande