लातूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय कन्या दिवसाचे औचित्य साधून लातूर शहरातील संजय राजुळे यांनी आपली ०९ वर्षीय दिव्यांग मुलगी कु. साईश्रद्धा हिच्या हस्ते लातूरचे जिल्हाधिकारी वर्ष ठाकूर-घुगे यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत २१ हजारांचा धनादेश दिला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत देण्यात आली. या उपक्रमाचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक करीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नागरिकांनी पुढे येवून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.
लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेती पिकं आणि शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या संकट काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संजय राजुळे यांनी त्यांची ०९ वर्षीय दिव्यांग मुलगी कु. साईश्रद्धा संजय राजुळे हिच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजार रुपयांचा धनादेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याकडे सुपूर्द केला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महापालिका आयुक्त मानसी यांची उपस्थिती होती.
आठ वर्षीय अधिराज वागदरे याने संकलित केली मदत
शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाच्या बातम्या वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यावरून पाहताना आपणही शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे, या भावनेतून लातूर शहरातील कातपूर रोडवर परिसरात राहणाऱ्या अधिराज माधवराव वागदरे (वय ८ वर्षे) याने आपल्या गल्लीतील नागरिकांना मदतीचे आवाहन करीत मदत संकलित केली.
यासाठी त्याने अनोखी पेटी तयार करून त्यावर शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन करणारे संदेश रेखाटले होते. त्याने यामाध्यमातून संकलित केलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यासाठी थेट अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्याकडे जमा केली. लातूर येथील युनिक इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या अधिराजची प्रेरणा घेवून इतरांनीही शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी पुढे येवून मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीमती करमरकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis