जळगाव, 1 ऑक्टोबर (हिं.स.) दोन दिवसापूर्वी जामनेर शहरात चारचाकी गाडीत अवैधरीत्या गॅस भरत असताना सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली. यामुळे अवैध गॅस भरण्याच्या व्यवसायावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी जामनेरातील फत्तेपूर येथे प्रवासी वाहनात अवैध गॅस रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तब्बल साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.फत्तेपूर येथील सप्तशृंगी नगरात फत्तेपूर पोलिसांनी धाड टाकली. यात संजय संपत श्रावणे हा आपल्या राहत्या घरासमोर लोणी येथील दीपक रतन वावरे याच्या इको चारचाकी वाहनात एलपीजी गॅस सिलिंडरमधून अवैधरीत्या गॅस भरत असताना आढळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एमएच १९ डीव्ही ६५५७ या इको कारसह सहा सिलेंडर, गॅस भरण्यासाठी वापरले जाणारी मशीन असा एकूण तीन लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. पुरवठा निरीक्षक नारायण सुर्वे यांनी पंचनामा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर