दुबई, १ ऑक्टोबर, (हिं.स.) भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने आयसीसी पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीत इतिहास रचला आहे. आशिया कपमध्ये मालिकावीर म्हणून निवड झालेल्या अभिषेकच्या नावावर फलंदाजासाठी सर्वाधिक रेटिंग गुणांचा विक्रम आहे.अभिषेकने क्रमवारीत ९३१ रेटिंग गुण मिळवले आहेत. जे २०२० मध्ये इंग्लंडच्या डेव्हिड मलानने केलेल्या ९१९ गुणांच्या विक्रमापेक्षा १२ गुण जास्त आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या ६१ धावांच्या खेळीनंतर त्याने हा टप्पा गाठला होता. अभिषेकने आशिया कप संपेपर्यंत ९२६ गुणांचा टप्पा पार केला होता. जो दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या फिल साल्टपेक्षा ८२ गुण जास्त आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध ७५ धावांची शानदार खेळीही केली होती.
भारताच्या तिलक वर्माने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ४९ आणि पाकिस्तानविरुद्ध नाबाद ६९ धावा करत २८ गुण मिळवले आणि तिसरे स्थान कायम ठेवले आहे. श्रीलंकेचा पथुम निस्सांका शतक झळकावल्यानंतर पहिल्या पाच फलंदाजांमध्ये पोहोचला आहे . पाकिस्तानचा साहिबजादा फरहान (११ स्थानांनी प्रगती करत १३ व्या स्थानावर), भारताचा संजू सॅमसन (८ स्थानांनी प्रगती करत ३१ व्या स्थानावर) आणि बांगलादेशचा सैफ हसन (४५ स्थानांनी प्रगती करत ३६ व्या स्थानावर) यांनीही क्रमवारीत सुधारणा केली आहे.
गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा कुलदीप यादव पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेत ९ स्थानांनी प्रगती करत १२ व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा शाहीन शाह आफ्रिदी (१२ स्थानांनी प्रगती करत १३ व्या स्थानावर), बांगलादेशचा रिशाद हुसेन (६ स्थानांनी प्रगती करत २० व्या स्थानावर), भारताचा जसप्रीत बुमराह (१२ स्थानांनी प्रगती करत २९ व्या स्थानावर) आणि पाकिस्तानचा मोहम्मद नवाज (५ स्थानांनी प्रगती करत ४१ व्या स्थानावर) यांनीही त्यांच्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.
अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानचा सॅम अयुब पहिल्यांदाच पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, नेपाळचा दीपेंद्र ऐरी, अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी आणि भारताचा हार्दिक पंड्याला मागे टाकले.
नेपाळच्या क्रिकेटपटूंमध्ये दीपेंद्र ऐरीने गोलंदाजांच्या यादीत १० स्थानांनी झेप घेऊन ७२ व्या स्थानावर पोहोचला. ललित राजबोंगशी (सहा स्थानांनी ५१ व्या स्थानावर) आणि आसिफ शेख (तीन स्थानांनी ७७ व्या स्थानावर) यांनीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयानंतर क्रमवारीत सुधारणा केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे