“रायगडात आदर्श सहकारी पतसंस्थेचा दबदबा – सहकार क्षेत्रात पहिला क्रमांक”
९३५ कोटींचा व्यवसाय; १००० कोटींचे उद्दिष्ट २०२६ पर्यंत
“रायगडात आदर्श सहकारी पतसंस्थेचा दबदबा – सहकार क्षेत्रात पहिला क्रमांक”


रायगड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने तब्बल ९३५ कोटी रुपयांचा एकत्रित व्यवसाय साध्य करत रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर हे यश अधिक गाजले असून, याचा समारंभ बुधवारी आदर्श भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या वेळी संस्थापक सुरेश पाटील म्हणाले, “१००० कोटी रुपयांचा टप्पा गाठण्याचा संकल्प मार्च २०२५ मध्येच केला होता. कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे ९३५ कोटींचा पल्ला गाठता आला. मार्च २०२६ पर्यंत आम्ही नक्कीच १००० कोटींचे उद्दिष्ट पूर्ण करू. आणि हे करताना कसलीही तडजोड केली जाणार नाही.” संस्थेच्या यशामागे ग्राहकांचा विश्वास महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यावर भर देत सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदय जोशी म्हणाले, “ग्राहकांच्या विश्वासामुळेच आदर्शने रायगडात पहिला क्रमांक मिळवला आहे. मात्र हा क्रमांक टिकवण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील.”

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता पाटील क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, वात्सल्य ट्रस्टच्या अध्यक्षा सौ. शोभा जोशी उपस्थित होते. तसेच अध्यक्ष अभिजित पाटील, उपाध्यक्ष कैलास जगे, संचालक मंडळाचे सदस्य, डॉ. मकरंद आठवले, अँड. आत्माराम काटकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मीनाक्षी पाटील आदी मान्यवर सहभागी झाले. समारंभाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी उमेश पाटील यांनी केले व आभार प्रदर्शनही त्यांनीच मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande