अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी, त्यांच्या डोळ्यांत आशेचा किरण निर्माण करण्यासाठी व त्यांच्या आयुष्याला नवी उमेद देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला उदारतेने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीने राज्यात नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून शेतकऱ्यांची पीके पाण्याखाली गेली आहेत. घरे, दुकाने, जनावरे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबे बेघर झाली असून त्यांच्या निवाऱ्याचे, अन्नधान्याचे, व आरोग्यसेवेचे मोठे संकट उभे राहिले आहे. ही नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत करणारी ठरली आहे.
या आपत्तीवर मात करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर उपाययोजना करीत आहे. मात्र, पूरग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी समाजातील सर्व घटकांनी मदतीचा हात पुढे करणे तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राची परंपरा ही संकटकाळात एकदिलाने उभे राहण्याची आहे. आज पुन्हा एकदा ती परंपरा जपण्याची वेळ आली आहे.
आपले योगदान हे एका कुटुंबाला निवारा देईल, एका मुलाला शिक्षणाची नवी संधी देईल, एका रुग्णाला औषधोपचार मिळवून देईल, एका शेतकऱ्याला पुन्हा शेती उभारण्याचे बळ देईल. म्हणूनच सर्व समाजातील दानशूर व्यक्ती, उद्योगपती, व्यापारी वर्ग, सामाजिक संस्था, पतसंस्था, बँक, शासकीय व निमशासकीय कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मनःपूर्वक योगदान देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
योगदानासाठी तपशील : मुख्यमंत्री सहाय्यता निधी
खातेदाराचे नाव : मुख्यमंत्री सहाय्यता निधी
बँकेचे नाव शाखा (कोड) : स्टेट बँक ऑफ इंडिया, मुख्य शाखा, फोर्ट (००३००)
बँक खाते क्रमांक व आयएफएससी : १०९७२४३३७५१, SBIN००००३००
शालेय किट- स्कूल बॅग, 6 नोट बुक, कम्पॉक्स बॉक्स, प्रथमोपचार पेटी : (१) कापूस (२) रोल बँडेज (३) बँडएड (४) पेस्ट (५) टूथब्रश (६) डेटॉल (७) टॅब. पॅरासिटामोल (८) टॅब. डायक्लोफेनॅक (९) सिप्लाडाइन क्रीम (१०) अँटीसेप्टिक पावडर (११) गेज चित्र (१२) वेदना कमी करणारा स्प्रे.
या आपत्तीच्या काळात आपण सर्वांनी पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी उभे राहू या आणि त्यांना नवजीवन देऊ या.
अधिक माहितीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नविन इमारत, पहिला माळा, नैसर्गिक आपत्ती कक्षाचे बाजुला, अकोला येथे संपर्क साधावा. *संपर्क :* डॉ. विशाल येदवर, अध्यक्ष, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला (मो. क्रमांक 96893 10031), जगदीश वानखडे, समाजसेवा अधिक्षक, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे