अकोला, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। नवदुर्गा मूर्ती विसर्जन, तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला शहरात मिरवणूक, सभा आदी कार्यक्रम लक्षात घेऊन दि. 3 ऑक्टोबरला सकाळी 6 वा. पासून ते दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वा. पर्यंत अकोला शहर व अकोला – अकोट राज्य मार्ग व पारस फाटा- बाळापूर या मार्गावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा दंडाधिकारी वर्षा मीना यांनी जारी केला.
या कालावधीत डाबकी रस्त्याकडून बसस्थानकाकडे जाणारी व मामा बेकरीकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्ग : भांडपुरा चौक, पोळा चौक, हरिहर पेठ, वाशीम बायपास, लक्झरी स्टँड, निमवाडीसमोरील उड्डाण पूल, हुतात्मा चौक, सिव्हिल लाईन चौक, टपाल कार्यालय मार्गे बसस्थानक अशी वळविण्यात येईल.
अकोला बसस्थानकाकडून हरिहरपेठेकडे जाणारी वाहतूक : टपाल कार्यालय चौकाकडून सिव्हिल लाईन, नेहरू उद्यान, हुतात्मा चौक, उड्डाण पूल, निमवाडी पोलीस वसाहतीसमोरून वाशिम बायपास, हरिहर पेठेतून जुन्या शहराकडे वळविण्यात येईल.
रेल्वे उड्डाण पुलाकडून कोतवाली, लक्झरी बसस्टँडकडे जाणारी वाहतूक अग्रसेन चौक, उड्डाण पुलावरून कारागृह चौक मार्गे जाईल. लक्झरी बसस्थानकाकडून अकोट स्टँडकडे जाणारी वाहतूक कारागृह चौकातून अग्रसेन चौक मार्गे जाईल.
अकोला – अकोट राज्य मार्गावरील वाहतूक!
अकोला ते अकोटकडे जाणारी वाहतूक व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : अकोला बसस्थानक, टपाल कार्यालय चौक, सिव्हिल लाईन चौक, नेहरू उद्यान, उड्डाण पुलावरून वाशिम बायपासकडे, शेगाव टी पॉईंट, गायगाव, देवरी अकोट अशी जाईल.
अकोला बसस्थानक ते म्हैसांग मार्गे दर्यापूर तसेच दर्यापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : टॉवर चौक, न्यायालय मुख्य प्रवेशद्वारापुढून टिळक उद्यान, सातव चौक, बिर्ला राम मंदिर रेल्वे गेट, नवे तापडियानगर, खरप टी पॉईंट, म्हैसांग मार्गे जाईल व येईल.
अकोला पारस फाटा – बाळापूर – खामगाव मार्गावरील वाहतूक!
अकोला ते बाळापूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : अकोला- पारस फाटा हायवे ट्रॅप कार्यालयाकडून बाळापूरकडे जाईल व येईल. खामगाव ते पारस फाटा, पातूरकडे जाणारी व येणारी वाहतूक पर्यायी मार्ग : पारस फाटा, वाशिम बायपास चौक मार्गे वळविण्यात येईल.
अकोल्याहून खामगावकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गे : अकोला-पारस फाट्याजवळील रोशन धाबा येथून तपे हनुमान मंदिराजवळील डिव्हायडर बॅरेकेटींग पॉईंटपर्यंत वळविण्यात येईल. हे आदेश सर्व वाहनांना लागू राहतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे