अकोला, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - पतीच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. अकोल्यातील शिवापुर म्हाडा कॉलनी परिसरातील ही घटना आहे. मृत महिलेचे नाव मीरा मुरलीधर मानकर असे असून ती एका मुलाची आई आहे.
पोलीस तक्रारीनुसार, मीराचा तिच्या पती मुरलीधर मानकर यांच्यासोबत काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू होता. या वादानंतर काही दिवसांपूर्वी पती मुरलीधर याने घर सोडले होते, याबाबतची तक्रार देखील खदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या सततच्या कलहातून त्रस्त झाल्यानेच मीराने आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मीराच्या पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोपही माहेरच्यांनी केला आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून मीराचा खून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात चर्चेला उधाण आलंय. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे