अमरावती जि.प.ला एकाच दिवशी दोन नवे अधिकारी
अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)अमरावती जिल्हा परिषदेला एकाच दिवशी दोन नवे अधिकारी मिळाले आहेत. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील गट ''अ'' मधील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिक
अमरावती जि.प.ला एकाच दिवशी दोन नवे अधिकारी: विनय ठमके अतिरिक्त सीईओ, श्रीराम कुळकर्णी जीएडीचा पदभार घेणार


अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)अमरावती जिल्हा परिषदेला एकाच दिवशी दोन नवे अधिकारी मिळाले आहेत. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने महाराष्ट्र विकास सेवा संवर्गातील गट 'अ' मधील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी या दोन्ही पदांवर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी लवकरच आपला पदभार स्वीकारतील.

अकोला येथील विनय ठमके यांची अमरावती जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष जोशी यांची कोल्हापूर येथे बदली झाल्यापासून हे पद रिक्त होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी प्रीती देशमुख यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. ठमके त्यांच्याकडूनच नवी जबाबदारी स्वीकारतील.सामान्य प्रशासन (जीएडी) विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉ. श्रीराम कुळकर्णी यांची नियुक्ती झाली आहे. यु. आर. म्हेत्रे यांच्या बदलीने हे पद रिक्त झाले होते. डॉ. कुळकर्णी सध्या आयुक्त कार्यालयात मग्रारोहयोचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे प्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही अधिकाऱ्यांनी यापूर्वीही अमरावती जिल्हा परिषदेत काम केले आहे.या दोन अनुभवी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्रा यांच्या चमूत मनुष्यबळाची वाढ झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजाला गती मिळेल आणि अनेक नवीन बदल दिसून येतील अशी अपेक्षा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande