अबुधाबी, 1 ऑक्टोबर (हिं.स.) आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भारतीय संघाला आशिया कप विजेत्याचा ट्रॉफी सादर न केल्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तीव्र निषेध केला. बैठकीत बीसीसीआयने एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना चांगलेच कोंडीत पकडले. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत भारताने नवव्यांदा स्पर्धा जिंकली.
भारतीय क्रिकेटपटूंनी नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यामुळे ट्रॉफी सादर न करताच पुरस्कार सोहळा संपला. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटूंनी ट्रॉफीशिवायच आपल्या विजेतेपदाचा आनंद साजरा केला. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी नंतर सांगितले की, नक्वी ट्रॉफी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत घेऊन गेले होते. आणि बोर्ड आयसीसीकडे तक्रार करेल.
बीसीसीआयला ट्रॉफी द्यायची आहे. पण एसीसी अध्यक्ष मोहसीन नक्वी सध्या तसे करण्यास तयार नाहीत. नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत आणि ते भारतविरोधी विधानांसाठी ओळखले जातात. भारताने खूप आधी जाहीर केले होते की, ते नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. पण असे असूनही, ट्रॉफी सादरीकरण समारंभात नक्वी स्टेजवरून निघून गेले नाहीत. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनीही क्रिकेटपटूंच्या कृतीचे समर्थन केले आणि सांगितले की, भारतीय संघाची कृती पूर्णपणे न्याय्य आहे आणि बोर्ड नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसी बैठकीत तीव्र निषेध नोंदवेल.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि माजी कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी एसीसीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंडळाचे प्रतिनिधित्व केले. आशिया कप ट्रॉफी अजूनही एसीसी कार्यालयात पडून आहे आणि ती विजेत्या संघाला कधी सादर केली जाईल हे अद्याप स्पष्ट नाही. एसीसीच्या बैठकीत आशिया कप पुरस्कार सोहळ्यानंतर एसीसीचे अध्यक्ष नक्वी यांनी रचलेल्या नाट्याबद्दल भारताने तीव्र निषेध केला. यादरम्यान, राजीव म्हणाले की, ट्रॉफी विजेत्या संघाला सादर करावी. ही एसीसीची ट्रॉफी आहे आणि त्याचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही.
नक्वी बीसीसीआयच्या भूमिकेशी सहमत नव्हते. नक्वी यांनी आग्रह धरला की, या मुद्द्यावर एजीएममध्ये चर्चा होऊ नये आणि दुसऱ्या वेळी यावर चर्चा करावी. या बैठकीचा अजेंडा उपाध्यक्ष निवडणे हा होता, पण तेही होऊ शकले नाही. भारताने आशिया चषक जिंकल्यानंतर नक्वी यांनी बीसीसीआय सदस्यांचे अभिनंदन केले नाही, असे समजते. पण संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाचे शेलार यांनी कौतुक केले. शेलार यांनीच नक्वी यांना संघाचे अभिनंदन करण्यास भाग पाडले.
बैठक सुरू झाल्यावर, नक्वी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या भाषणात नेपाळचे अभिनंदन केले, ज्याने वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी मंगोलियाला एसीसीचे सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन केले आणि त्यांचे भाषण संपवले. त्यानंतर शेलार यांनी नक्वी यांनी भारताचे आशिया चषक जिंकल्याबद्दल अभिनंदन का केले नाही हा मुद्दा उपस्थित केला. यामुळे नक्वींवर भारताचे अभिनंदन करण्यासाठी दबाव आला आणि त्यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआय हा मुद्दा उपस्थित करेल. शुक्ला आणि शेलार यांनी एसीसीने ट्रॉफी त्यांच्या कार्यालयात ठेवावी आणि बीसीसीआय तेथून ती घेईल असा आग्रह धरला. त्यांनी म्हटले, 'विजेते म्हणून आम्हाला ट्रॉफी हवी आहे.' पण सध्या नक्वी यासाठी तयार नव्हते. त्यामुळे बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार करणार हे स्पष्ट आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान तीन वेळा एकमेकांसमोर आले आहेत आणि भारताने तिन्ही वेळा आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला हरवले आहे, ज्यामध्ये अंतिम सामनाही समाविष्ट आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सामना सुरुवातीपासूनच वादात सापडला कारण भारतीय क्रिकेटपटूंनी हस्तांदोलन न करण्याचे धोरण स्वीकारले आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे