चंद्रपूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रम, देवाडा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, समुपदेशन तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार (2005 चा कायदा)’ या विषयावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
समुपदेशक अतुल शेंद्रे यांनी वृद्धांच्या सामाजिक, मानसिक व आरोग्य विषयक अडचणींवर उपाययोजना आणि ताण-तणाव कमी करण्याच्या उपायांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डी.आर. धात्रक, ज्योती शेंडे, पूनम आसेगावकर, श्वेता लखावार, वैशाली ठाकरे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव