अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.) : धामणगाव रेल्वे तालुक्यातील परसोडी, हिंगणगाव व कासारखेड, निंबोली येथील नागरिकांनी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी धामणगांव रेल्वेतील वीर महाराणा प्रताप चौक येथे मोठ्या प्रमाणावर चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनात हजारो नागरिक, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते.सरपंच दुर्गाबक्ष ठाकूर व उपसरपंच संगीता धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन राबविण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, विद्यार्थ्यांना शाळा–महाविद्यालयात ये-जा करताना धोका निर्माण होत आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थी प्रत्यक्ष खड्ड्यांमध्ये उभे राहून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आंदोलनामुळे वीर महाराणा प्रताप चौकात चक्काजाम झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली. यावेळी दत्तापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन चौकात बंदोबस्त ठेवला. नागरिकांची वाढती गर्दी व संताप पाहता वातावरण तणावपूर्ण झाले होते.या आंदोलनाची दखल घेत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन नागरिकांना रस्ता लवकरच दुरुस्त करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच आमदार प्रताप अडसड यांनीही संदेशाद्वारे नागरिकांना रस्ता लवकरच दुरुस्त होणार असल्याचे आश्वासन दिले.अधिकाऱ्यांच्या व आमदारांच्या आश्वासनानंतर नागरिकांनी समाधान व्यक्त करत चक्काजाम आंदोलनाची सांगता केली. तरीही रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी