कोल्हापूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। समाजातील महिलांचे स्थान उंचावण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात आयोजित ‘पॉश कायदा २०१३’ (कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण) विषयावरील प्रशिक्षण सत्रात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन महिला आयोग, जिल्हा महिला व बाल कल्याण विभाग कोल्हापूर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, प्रशिक्षक अमृता करमरकर आणि सुजित इंगवले यांच्या सह विविध आस्थापनेतील अधिकारी तसेच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, पॉश कायदा प्रत्येक कामाच्या ठिकाणी लागू आहे. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय, खाजगी आस्थापना आणि संस्थांमध्ये तक्रार निवारण समित्यांची स्थापना आवश्यक आहे. त्या कार्यरत राहाव्यात, यावरही त्यांनी भर दिला. पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. महिलांनी धाडसाने पुढे येऊन कामाच्या ठिकाणी स्थापन केलेल्या समितीकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
आयोग प्रत्येक जिल्ह्यात कायद्याची माहिती पोहोचवण्यासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करत आहे. लैंगिक शोषणासह मानसिक त्रास देणेही या कायद्यांतर्गत गुन्हा आहे. शासनाने महिलांच्या सुरक्षिततेसाठी कडक तरतुदी केल्या असूनही, अनेक महिला तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत, याबाबत चाकणकर यांनी खंत व्यक्त केली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालयांमध्ये पॉश समित्यांची स्थापना झाल्याचे नमूद करत कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच, लक्ष्मीमुक्ती योजनेसह जिल्ह्यातील महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी प्रशिक्षण सत्राचा उद्देश विशद करीत जागरूकतेवर भर देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आयोगाने तयार केलेल्या माहिती घडिपत्रिकेचे अनावरण करण्यात आले.
तत्पूर्वी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले, तर जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापूर पर्यटन पुस्तिकेद्वारे अध्यक्षा चाकणकर यांचे स्वागत केले. प्रशिक्षक अमृता करमरकर यांनी कायद्याची सविस्तर माहिती देत उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar