रायगड, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। महाड व पोलादपूर तालुक्यात राबविण्यात आलेल्या “सेवा पंधरवडा” या उपक्रमाचा यशस्वी समारोप आमदार नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते पार पडला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून व महात्मा गांधींच्या सेवाभावातून प्रेरणा घेत या पंधरवड्यात विविध लोकहिताचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नवीन मतदार नोंदणी, उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, रेशन कार्ड वाटप, तसेच महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. शेतकऱ्यांसाठी पाणंद व स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे नकाशीकरण झाले. ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत १०५ कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या जागेची सनद मिळवून देण्यात आली. याशिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना जन्म दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
गोगावले म्हणाले, “ही सेवा म्हणजे कृती नव्हे तर जनतेच्या आशीर्वादाची खरी ताकद आहे.” त्यांनी या उपक्रमात मेहनत घेतलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानले.समारोप प्रसंगी तहसीलदार कपिल घोरपडे, महेश शितोळे, गटविकास अधिकारी व स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. स्थानिकांना या उपक्रमातून समाजाभिमुख सेवाभावाची नवी दिशा मिळाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके