जळगाव, 1 ऑक्टोबर (हिं.स.) जळगावच्या विदगाव जवळील तापी पुलावर भीषण अपघात झालाय. यात भरधाव अवैध वाळूच्या डंपरने कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, यामुळे कार हवेसारखी उडून कठडे तोडत थेट नदीपात्रात कोसळली. या घटनेत माय-लेकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) व त्यांचा मुलगा पार्थ (१२) असं मृत आईसह मुलाचे नाव असून नीलेश प्रभाकर चौधरी (३६) व लहान मुलगा ध्रुव (४) हे असे गंभीर जखमी झालेल्यांचे नाव आहे. ही घटना काल ३० सप्टेंबरच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर सुसाट धावत असून डंपरच्या धडकेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान जळगाव ते चोपड्याच्या दरम्यान असलेल्या तापी नदीवरील विदगाव पुलावर डांभुर्णी येथून जळगावकडे येत असलेल्या भरधाव डंपरने कार क्रमांक एमएच.१९.डीव्ही.८०३२ ला जोरदार धडक दिली. यानंतर कार थेट कठडे तोडत नदीत कोसळली. या अपघातात चोपडा येथे जाणाऱ्या कुटुंबातील चौघांपैकी माय-लेकाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर