परभणी, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।
परभणी शहरातील जम-जम कॉलनी वार्ड क्रमांक 12 मधील रहिवाशांना गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. या रहिवाशांना तातडीने भरपाई व महिन्याभरासाठी प्रशासनाकडून राशन किट देण्यात यावे, अशी मागणी मिल्लत सेवाभावी संस्था, परभणी व जम-जम सेवाभावी संस्था, परभणी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन अब्दुल अलीम (अध्यक्ष, मिल्लत सेवाभावी संस्था) व शेख शफी (संस्थापक अध्यक्ष, जम-जम सेवाभावी संस्था) यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
वार्डातील रहिवाशी रोजंदारी मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असून, अतिवृष्टीमुळे त्यांचे घर व संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्येक बाधित कुटुंबाला २५,००० रुपयांची नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने महिनाभरासाठी मोफत राशन किट पुरविण्याची मागणीही करण्यात आली.
कवडगाव नदीपासून कवडगाव रेल्वे गेटपर्यंत रस्त्याच्या बांधकामाचे काम शासनाकडून मंजूर झाले होते. या रस्त्याचे उद्घाटन दि. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु गुत्तेदारांनी फक्त गिट्टी व मुरुम टाकून काम अर्धवट सोडले असल्याचा आरोप संस्थांनी केला आहे. या कामाची तातडीने चौकशी करून अपूर्ण रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांची दखल जर प्रशासनाने पुढील १५ दिवसांत घेतली नाही, तर मिल्लत सेवाभावी संस्था अध्यक्ष अब्दुल अलीम व जम-जम सेवाभावी संस्था अध्यक्ष शेख शफी, कार्यकर्ते विनोद अंभोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले जाईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis