छत्रपती संभाजीनगर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे तुळजाभवानीला आज साकडे घातले, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी धावत जाऊन दर्शन घेतले.
राज्यातील बळीराजा अतिवृष्टीच्या संकटामुळे हतबल झाला असून, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. या कठीण काळात सरकारकडून तातडीने मदत मिळावी, या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज धाराशिव ते तुळजापूर धावत जाऊन आई तुळजाभवानीच्या चरणी साकडे घातले.
याच पार्श्वभूमीवर, खासदार निंबाळकर यांनी आज धाराशिव ते तुळजापूर हे अंतर धावत पूर्ण केले आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. आई, माझ्या बळीराजावरचं हे संकट दूर कर. त्याला सुखाचे दिवस दाखव आणि या संकट काळात सरकारला तातडीने मदत करायची सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना त्यांनी केली.
आपल्या प्रार्थनेतून त्यांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या घरात सुख-समृद्धी नांदावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खासदारांच्या या अनोख्या आंदोलनाने आणि प्रार्थनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
खासदार निंबाळकर म्हणाले, बळीराजावर निसर्गाचा कोप कोसळला आहे. अतिवृष्टीमुळे शेतं उद्ध्वस्त झाली, पिकं वाहून गेली, जनावरांचं मोठं नुकसान झालं. अशा स्थितीत बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे. संकटाच्या या काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis