लोकशाही पद्धतीने लढा, पण आपला जीव लाखमोलाचा आहे – आ. डॉ. रत्नाकर गुट्टे
परभणी, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा जीव समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे. समाजाला आपली ताकद, धैर्य आणि नेतृत्वाची गरज आहे. मागण्या मांडत राहा, शासनापर्यंत आवाज पोहोचवत राहा, पण जीवावर उदार होऊन आत्महत्येचा मार्ग अ
आ. डॉ. रत्नाकर गुट्टे


परभणी, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या प्रत्येकाचा जीव समाजासाठी अत्यंत महत्वाचा आहे. समाजाला आपली ताकद, धैर्य आणि नेतृत्वाची गरज आहे. मागण्या मांडत राहा, शासनापर्यंत आवाज पोहोचवत राहा, पण जीवावर उदार होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका. आपला जीव हा समाजासाठी लाखमोलाचा आहे. म्हणून लोकशाही मार्गाने एकजुटीने लढा पुढे नेऊया आणि आपल्या भावी पिढ्यांना न्याय मिळवून देऊया, असे भावनिक आवाहन स्थानिक आमदार आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी धनगर समाज बांधवांना केले.

उपजिल्हा रुग्णालय, गंगाखेड येथे सामाजिक कार्यकर्ते सुरेश दादा बंडगर यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर आ. डॉ. गुट्टे यांनी समाजाला संयम आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी जालना येथे दीपक बोऱ्हाडे व सहकारी आमरण उपोषण करत आहेत. या उपोषणाला समर्थनार्थ बंडगर यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलिस व नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

या पार्श्वभूमीवर आ. गुट्टे यांनी रुग्णालयात भेट देऊन बंडगर यांच्याशी आपुलकीने संवाद साधला. ते म्हणाले की, “धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सातत्याने पत्रव्यवहार करून ठाम भूमिका घेतली आहे. या प्रश्नावर मी आत्तापर्यंत पाठिंबा दिला आहे आणि पुढेही देत राहीन. कारण समाजाच्या मागण्या भावनिक नाहीत, तर ऐतिहासिक व सामाजिक न्यायाशी निगडित आहेत.”

पुढे त्यांनी स्पष्ट केले की, धनगर समाजाच्या मागण्या रास्त आहेत, पण त्यासाठी आत्महत्येचा मार्ग योग्य नाही. “इतिहास साक्षी आहे की लोकशाही मार्गाने झालेली प्रत्येक लढाई यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आपल्या भावना जपत, संयम राखून, लोकशाही मार्गाने आपण आपल्या हक्कांसाठी लढा दिला पाहिजे,” असे ते म्हणाले.

या प्रसंगी गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, बंडगर कुटुंबीय तसेच मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande