परभणी : अष्टभुजा देवी मंदिरात ३५६ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी
परभणी, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क येथे दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी व Medivision यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन कर
अष्टभुजा देवी मंदिरात ३५६ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी


परभणी, 1 ऑक्टोबर, (हिं.स.)। शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क येथे दर्शनासाठी आलेल्या भाविक भक्तांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, परभणी व Medivision यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला भाविक भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने लाभ घेतला. दिवसभर चाललेल्या या शिबिरामध्ये ३५६ भाविकांची मोफत तपासणी करण्यात आली.

शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, डोळ्यांची तपासणी तसेच लहान-मोठ्या आजारांवरील सल्ला व औषधोपचार करण्यात आले. महिलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मार्गदर्शन देण्यात आले. यामुळे अनेक भाविकांना त्यांच्या आरोग्याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळाले.

या शिबिरामध्ये डॉ. केदार खटिंग, डॉ. गोविंद यादव, डॉ. निखिल बायडे, डॉ. गणेश पारवे या सुप्रसिद्ध डॉक्टरांसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, RP मेडिकल कॉलेज आणि PD जैन महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी भाविकांच्या तपासणीसह औषधोपचार व सल्ला दिला.

शिबिर यशस्वी होण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हाप्रमुख डॉ. गिरीश कोसर्डीकर, शहर मंत्री सेजल काळे, Medivision संयोजक देवयानी पाटील, जिल्हा संयोजक मुक्तेश भंडारे, राजवर्धन हम्बे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच मंदिर समितीतील कोषाध्यक्ष विठ्ठल शहाणे, संतोष अग्रवाल व इतर स्वयंसेवकांनी शिबिराचे आयोजन आणि व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

यावेळी शहर मंत्री सेजल काळे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सर्व डॉक्टर, विद्यार्थी, भाविक भक्त व कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “आरोग्य हीच खरी संपत्ती असून समाजासाठी असे शिबिरे अत्यंत उपयुक्त आहेत. आगामी काळातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल.”

अष्टभुजा देवी मंदिर परिसरात भाविकांना आरोग्याबरोबरच श्रद्धेची जोड मिळाल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande