गडचिरोली., 1 ऑक्टोबर (हिं.स.) : गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्याच्या माओवादग्रस्त भागात मोठी कारवाई करत माओवाद्यांच्या दोन जुन्या स्मारकांचा विध्वंस केला आहे. कटेझरी पोलीस स्टेशन हद्दीतील कटेझरी आणि मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेली ही दोन ते तीन वर्षांपूर्वीची स्मारके सुरक्षा दलातील जवानांनी नष्ट केली.
माओवाद्यांचे भूतकाळातील हिंसाचार आणि दहशतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या स्मारकांवर 30 सप्टेंबर रोजी कारवाई करण्यात आली.
पोस्टे कटेझरी येथील पोलीस पथक आणि एसआरपीएफच्या जवानांनी संयुक्तपणे अभियान राबवताना ही स्मारके शोधली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बिडीडीएस पथकाने तपासणी केल्यानंतर दोन्ही स्मारके तातडीने उद्ध्वस्त करण्यात आली.
वृक्षारोपण करून शांततेचा संदेश
स्मारके पाडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. या कृतीतून पोलीस दलाने जनतेला शांतता आणि सुरक्षेचा स्पष्ट संदेश दिला आहे.
यावेळी पोलिसांनी नागरिकांना माओवाद्यांच्या खोट्या भूलथापांना बळी न पडता पोलीस दलाला सहकार्य करण्याचे आणि गावाच्या विकासात सहभागी होण्याचे आवाहन केले.
पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी यावेळी सांगितले की, माओवाद्यांच्या दहशतीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दल प्रयत्नशील आहे. तसेच, त्यांनी माओवाद्यांच्या अशा बेकायदेशीर स्मारकांना समाजात कोणतेही स्थान नाही, असे स्पष्ट करून नागरिकांनी अशा कामांमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन केले.
या यशस्वी कारवाईमुळे माओवादविरोधी अभियानांना बळ मिळाले असून, जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond