नांदेड, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।
इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह योजना सुरु झालेली आहे.
वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी भोजन तसेच निवास व्यवस्था व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यात येते. तसेच शासकीय वसतीगृहासाठी पात्र असलेल्या तथापी गुणवत्तेनुसार व वसतीगृहाच्या क्षमतेअभावी वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज पंडित दिनदयाळ स्वयंम व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी विचारात घेतले जातील.
इच्छुक विद्यार्थी - विद्यार्थीनीनी जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या बारावी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास असणाऱ्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रथम वर्षातील अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सन 2025-26 या वर्षासाठी शासकीय वसतिगृह योजनाचे ऑनलाईन पध्दतीने अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर 26 ऑक्टोबरपर्यत भरावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक सचिन खुणे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis