अमरावती, 1 ऑक्टोबर (हिं.स.)आमच्या गावात विष ओतलं जातंय, संसार उद्ध्वस्त होतायत, युवक बरबाद होतायत, आणि पोलीस मात्र डोळेझाक करतायत! – अशा शब्दांत चांदूर रेल्वे तालुक्यातील व नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धानोरा (मोगल) गावकऱ्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मिळून नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना निवेदन देत गावातील अवैध दारू व जुगाराचे अड्डे तात्काळ बंद करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सतत तक्रारी करून, दारूबंदीचा ठराव करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
नुकत्याच ठाणेदारांनी गावाला दिलेल्या भेटीतही नागरिकांनी थेट नाराजी व्यक्त करत गाव उद्ध्वस्त होतंय, पण पोलीस मौन बाळगत आहेत! असा सवाल केला. त्यानंतर पुन्हा एकदा ठोस कारवाईसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी सरपंच अमोल लहाबर, उपसरपंच शितल काळमेघ, सदस्य रविंद्र वानखडे, सागर झाकर्डे, प्रिया गुल्हाने, प्रियंका चौधरी, मिना ठाकरे यांसह महिला गावकरी संजीवनी नागोसे, पूजा काळसर्पे, तारा सोनवणे, सुनीता सोळंके, कुसुम चौधरी, रंजना नेवारे, मंगला शेंडे, प्रतिभा कोळमकर, माया वानखडे, उषा मारबदे, मीना मारबदे, विमल सोनोने, सुवर्णा राठोड, रजनी शेंडे, सुशीला शेंडे, कोकीळा इंगळे, आरती शेंडे व इतर मोठ्या संख्येने जमले होते. गावातील महिला, वृद्ध व युवक सर्वांनी एकमुखाने आवाज उठवत आमच्या गावाला दारूमुक्त करा! अशी आर्त मागणी केली. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पोलिसांनी आता तरी गांभीर्याने लक्ष घालून अवैध धंदे बंद केले नाहीत, तर लवकरच तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे म्हणाले.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी