भामरागडमध्ये घातपातासाठी रेकी करणाऱ्या कट्टर नक्षल समर्थकाला अटक
जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण ११० माओवाद्यांना अटक गडचिरोली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी (गुप्त टेहळणी) करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला गडच
रेकी करताना पोलिसांनी पकडलेला नक्षल समर्थक


जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण ११० माओवाद्यांना अटक

गडचिरोली, 1 ऑक्टोबर (हिं.स.) - माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करून घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी (गुप्त टेहळणी) करणाऱ्या एका कट्टर नक्षल समर्थकाला गडचिरोली पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) संयुक्त कारवाईत अटक केली आहे. सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी (३८, रा. पोयारकोठी, ता. भामरागड) असे अटक करण्यात आलेल्या नक्षल समर्थकाचे नाव आहे. याच्या अटकेमुळे सुरक्षा दलांनी गडचिरोलीतील माओवादविरोधी अभियानाला मोठे यश मिळवले आहे.

दिनांक २९/०९/२०२५ रोजी पोस्टे भामरागड येथील पोलीस पथक आणि सीआरपीएफचे जवान माओवादविरोधी अभियान राबवत असताना, इंट सेल प्राणहिता येथील अधिकाऱ्यांस गोपनीय माहिती मिळाली की, एक संशयित व्यक्ती भामरागड परिसरात जवानांची रेकी करत आहे. या माहितीवरून तात्काळ कारवाई करत जवानांनी त्याला ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने त्याला पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणून सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीअंती तो कट्टर नक्षल समर्थक सैनु ऊर्फ सन्नु अमलु मट्टामी असल्याचे उघड झाले.

चकमकीत सक्रिय सहभाग

अधिक चौकशीत समोर आले आहे की, सैनु मट्टामी हा केवळ रेकी करण्याच्या उद्देशाने नव्हे, तर त्याचा पोलीस अभिलेखावरील विध्वंसक कारवाया आणि गुन्ह्यांमध्ये सक्रिय सहभाग आहे. विशेष म्हणजे, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी पोस्टे कोठी हद्दीतील कोपर्शी-फुलनार जंगल परिसरात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता, हे निष्पन्न झाले आहे.

या गंभीर गुन्ह्याप्रकरणी त्याच्यावर कोठी पोलीस ठाण्यात अप. क्र. ०२/२०२५ अन्वये गुन्हा दाखल असून, दिनांक ३०/०९/२०२५ रोजी त्याला अटक करण्यात आली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड श्री. अमर मोहिते हे पुढील तपास करत आहेत. इतर विध्वंसक कारवायांमध्येही त्याच्या सहभागाची पडताळणी सुरू आहे.

माओवादविरोधी अभियानाला यश

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी माओवादविरोधी कारवाईमुळे जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत एकूण ११० माओवाद्यांना अटक करण्यात यश आले आहे.

या कारवाईमध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) श्री. संदिप पाटील, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी या यशानंतर सदर परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवाद्यांना हिंसक मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande