परभणी, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। गंगाखेड येथील यावर्षीचा रथोत्सव ठराविक वेळेनुसारच होणार असून या रथोत्सवाच्या मार्गात मात्र महापुरामुळे बदल करण्यात आला आहे.
गंगाखेड येथील रथोत्सव संपूर्ण राज्यात सर्वदूर परिचित आहे. विशेषतः सुमारे सातशे वर्षांची परंपरा असणार्या या रथोत्सवास लाखो भाविक दरवर्षी हजेरी लावत आले आहेत. गोविंदाच्या गजरात साजरा होणारा हा रथोत्सव भाविकांच्या दृष्टीने आनंददायी क्षण आहे. मात्र, यंदा गोदावरी नदीच्या महापुरामुळे रथोत्सव होईल की नाही, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
बालाजी मंदिर समितीच्या वतीने मात्र रथोत्सव ठराविक वेळेनुसारच पार पडणार, हे स्पष्ट करण्यात आले असून केवळ महापुरामुळे मार्गात बदल करण्यात आला आहे. हा रथोत्सव गुरुवारी दुपारी 1:30 वाजता बालाजी मंदिरातून निघणार आहे. दरवर्षीच्या नेहमीच्या मार्गाऐवजी यंदा रथ संत जनाबाई मंदिराजवळील गोरक्षण येथे थांबेल.यानंतर पारंपरिक पद्धतीनुसार, श्री बालाजीची मूर्ती घोडा या वहनावर घेऊन पुढील कार्यक्रम पार पडतील. सर्व धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच पार पडणार असल्याचे मंदिर समितीने जाहीर केले असून, भाविकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis