अहमदाबाद, 1 ऑक्टोबर (हिं.स.)भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर रोस्टन चेसकडे वेस्ट इंडिजच्या संघाची धुरा असणार आहे.
भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली होती. कर्णधार शुभमन गिल आणि संघातील इतर अनेक क्रिकेटपटू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजला भारताला रोखण्याचे आव्हान असणार आहे. कागदावर भारतीय संघ विंडीजपेक्षा अधिक मजबूत आहे .
वेस्ट इंडिजची कसोटी कामगिरी गेल्या काही काळात खराब राहिली आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली शेवटची कसोटी मालिका खेळली होती. त्यांना तीन सामन्यांच्या मालिकेत ०-३ असा क्लीन स्वीप कांगारुंनी दिला होता. रोस्टन चेसच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज आपली कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल.
भारतीय संघाला WTC फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यांना कॅरिबियन संघाला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावे लागणार आहे. पण ब्रिगेडसाठी हे काम सोपे राहणार नाही. कारण भारतीय संघाचा वेस्ट इंडिजविरुद्धचा कसोटी रेकॉर्ड चांगला नाही. दोन्ही संघांमध्ये एकूण १०० कसोटी सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतीय संघाने फक्त २३ जिंकले आहेत. वेस्ट इंडिजने ३० जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील ४७ सामने अनिर्णित राहिले आहेत.
या दौऱ्यात वेस्ट इंडिजला इतिहास रचण्याची सुवर्ण संधी असेल. कॅरिबियन संघाने २००२ पासून भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकलेली नाही. रोस्टन चेसच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजला २३ वर्षांनंतर भारताला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची सुवर्ण संधी आहे. शिवाय वेस्ट इंडिजने १९८३-८४ पासून भारतीय भूमीवर कसोटी मालिका जिंकलेली नाही. ४१ वर्षांनंतर त्यांना भारतात कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे