वॉशिंग्टन, 1 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, त्यांनी जगातील सात मोठे संघर्ष संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि तरीही जर त्यांना नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला नाही, तर ते अमेरिकेसाठी “मोठा अपमान” असेल.
गाझा संघर्ष समाप्त करण्याच्या त्यांच्या योजनेचा उल्लेख करताना, मंगळवारी क्वांटिको येथील लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले, “मला वाटतं आपण ते सोडवलं आहे. आता, हमासला सहमती द्यावी लागेल, आणि जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यासाठी ते खूप कठीण होणार आहे. सर्व अरब आणि मुस्लिम राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. इस्रायलही सहमत आहे. हे एक अद्भुत यश आहे की सर्वजण एकत्र आले आहेत.”
ट्रम्प म्हणाले की, जर सोमवारी जाहीर केलेली गाझा संघर्ष समाप्ती योजना यशस्वी झाली, तर काही महिन्यांत त्यांनी एकूण आठ संघर्षांचे समाधान केले असेल. ते म्हणाले, “हे अत्यंत शानदार आहे. कोणीही यापूर्वी असे केलेले नाही. तरीही, ‘तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळेल का?’ अजिबात नाही. ते पुरस्कार अशा व्यक्तीला देतील ज्याने काहीच केले नाही. कदाचित डोनाल्ड ट्रम्पने काय विचार केलं आणि युद्ध थांबवण्यासाठी काय केलं यावर पुस्तक लिहिणाऱ्या एखाद्या लेखकाला पुरस्कार मिळेल. पण पाहूया काय होतं.”
डोनाल्ड ट्रम्प पुढे म्हणाले, “हा आमच्या देशासाठी एक मोठा अपमान असेल. मी स्वतःसाठी नाही म्हणत. मी हे देशासाठी म्हणतो. हा सन्मान देशाला मिळाला पाहिजे कारण याआधी असं कधीच झालं नव्हतं. यावर नक्की विचार करा. मला वाटतं की गाझा योजना यशस्वी होईल. मी ही गोष्ट सहजपणे म्हणत नाही, कारण मी करारांबाबत कोणत्याही व्यक्तीपेक्षा जास्त जाणतो.”
नोबेल शांतता पुरस्काराबाबत माहिती
नोबेल शांतता पुरस्कार सहज मिळत नाही. त्यासाठी सर्वप्रथम नामांकन आवश्यक असतं. एखादा नेता, संस्था किंवा अधिकृत संस्था नामनिर्देशन करू शकते. त्यानंतर नॉर्वेतील नोबेल समिती अनेक महिने चौकशी करते. त्या चौकशीत हे पाहिलं जातं की खरंच कोणी जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे की फक्त सोशल मीडियावर आणि भाषणांत शांतीचा प्रचार केला आहे. ऑक्टोबरमध्ये विजेत्याची घोषणा होते आणि डिसेंबरमध्ये पुरस्कार वितरण केलं जातं.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode