लातूर, 1 ऑक्टोबर (हिं.स.)। जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून 1 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे समाज कल्याण विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक, अपोलो मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 120 पेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून या शिबिराची सुरुवात झाली. यावेळी समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, ज्येष्ठ कार्यकारी समितीचे शासकीय सदस्य बी.आर. पाटील, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे आर.बी. जोशी, महाराष्ट्र नागरिक कार्यकारी समितीचे शासकीय सदस्य प्रकाश घाडगिने, जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव रमेश भोयरेकर, प्रकाश निला, शहाजी घाडगे, किरण बंड्डे, बलभिम पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणीनंतर त्यांना फळे आणि अल्पोपहार देण्यात आले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis